Homeप्रतिसादसंघर्षाच्या अंधारातून स्वावलंबनाच्या प्रकाशाकडे...

संघर्षाच्या अंधारातून स्वावलंबनाच्या प्रकाशाकडे…

नवदुर्गा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांचा आणि उपलब्ध सेवा-सुविधांचा लाभ घेत अनेक महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून आपले विश्व उभे केले आहे. त्यांच्या जिद्दीची, संघर्षाची आणि यशाची प्रेरणादायी कहाणी ‘नवदुर्गा’ या सदरातून आपण जाणून घेणार आहोत.

….

आरती शर्मा खरोटे यांचा प्रेरणादायी प्रवास!

आई-वडिलांचे छत्र हरपले, परिस्थितीने बालपण हिरावून घेतले; पण जिद्दीने आयुष्याला नवी दिशा दिली. आशा सदनच्या आधाराने सुरू झालेला प्रवास आज स्वतःच्या केक शॉपची मालकीण आणि इतर महिलांना रोजगार देणारी यशस्वी उद्योजिका होण्यापर्यंत पोहोचला आहे.

“आई-वडील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, नियतीने घात केला आणि एका अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. क्षणात माझे संपूर्ण जगच हरपले. आई-वडिलांच्या मायेची ऊब काय असते, सुरक्षिततेची भावना काय असते, हे अनुभवण्याच्या वयातच मी पोरकी झाले. त्यानंतर काका-काकींकडे राहिले; पण तिथेही मनासारखे आयुष्य वाट्याला आले नाही. त्रासाला कंटाळून एक दिवस घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात जयश्री नावाच्या महिला पोलीस शिपायांनी मला पाहिले आणि लहान मुलांच्या संस्थेत दाखल केले. तेव्हा मी आठ ते दहा वर्षांची असेन…”
आरती शर्मा खरोटे आपल्या आयुष्यातील संघर्षाचा हा प्रवास सांगत असताना तिच्या शब्दांत भूतकाळातील वेदना होत्या; मात्र आजच्या आयुष्याबद्दलचा आत्मविश्वासही तितकाच ठळक होता. ज्या वयात मुलांनी आई-वडिलांच्या हाताला धरून जग पाहायचे असते, त्या वयात आरतीला आयुष्याशी एकटीने झुंज द्यावी लागली. पण तिच्या आयुष्याला एक नवा आधार मिळाला, तो म्हणजे महिला व बालविकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आशा सदन संस्थेचा.

आशा सदन : हरवलेल्या बालपणाला मायेचा आधार

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आरतीसाठी आशा सदन ही केवळ राहण्याची संस्था नव्हती, तर तिच्या आयुष्याला नवी दिशा देणारे घर होते. येथे तिला निवारा, भोजन, शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळाल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याचा आत्मविश्वास मिळाला.

आरती तब्बल आठ वर्षे आशा सदनमध्ये राहिली. या काळात तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच तिने शिलाई आणि कुकिंगचे प्रशिक्षणही घेतले. तिच्या मनात मात्र स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू होती.
आयुष्याने तिच्याकडून अनेक गोष्टी हिरावून घेतल्या होत्या; पण स्वप्न पाहण्याची ताकद मात्र हिरावून घेऊ शकले नव्हते.

आवडीतून व्यवसायाकडे… स्वप्नांना मिळाली नवी दिशा

आरतीला सुरुवातीपासूनच बेकरी व्यवसायाची विशेष आवड होती. केक बनविण्याच्या कामात तिला आनंद मिळत होता. तिच्यातील ही आवड आणि क्षमता ओळखून आशा सदनने तिला ‘Happiness’ या बेकरीमध्ये हेल्पर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. ही संधी तिच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरली.
बेकरीमध्ये काम करताना तिने केक बनविण्याचे तंत्र, कामातील बारकावे, ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि व्यवसायाचे व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवले. इतर मुली आत्मविश्वासाने काम करताना पाहून तिच्याही मनात विचार आला, “या मुली करू शकतात, तर मी का नाही?”

हा एक साधा विचार होता; पण त्यातूनच तिच्या स्वप्नांना नवी ऊर्जा मिळाली. तिने अधिक मेहनतीने केक बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. शिक्षण आणि नोकरी यांचा समतोल साधत ती स्वतःला घडवत राहिली.
आरतीचा प्रवास हळूहळू पुढे जात असतानाच कोविड महामारीचे संकट आले. अनेक व्यवसायांप्रमाणे तिच्या कामावरही त्याचा परिणाम झाला. तिला आपली नोकरी सोडावी लागली. पुन्हा एकदा आयुष्याने तिच्यासमोर कठीण प्रश्न उभे केले.

मात्र, यावेळी आरती एकटी नव्हती. तिच्या मेहनतीचा, प्रामाणिकपणाचा आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचा अनुभव घेतलेल्या दुकानमालकाने तिच्यावर विश्वास दाखविला. तिला दुकानाची नवीन शाखा सुरू करून दिली आणि ती शाखा पूर्णवेळ सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली.

आरतीसाठी हा केवळ व्यवसायाचा विस्तार नव्हता; तर तिच्या कष्टांना मिळालेली पावती होती. ज्या मुलीला कधीकाळी स्वतःच्या भविष्याची खात्री नव्हती, तिच्या हातात आता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी होती.

तिने या संधीचे सोने केले.
स्वतःच्या पायावर उभी राहिली… आता इतरांनाही देतेय आधार!

आज आरती शर्मा खरोटे स्वतःच्या केक शॉपची मालकीण आहे. ती केवळ स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. स्वतःच्या मुलाचे संगोपन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यवसाय या सर्वांचा समतोल ती समर्थपणे साधत आहे.

कधीकाळी स्वतःच्या आयुष्याला आधार शोधणारी आरती आज इतर महिलांसाठी रोजगाराचा आणि स्वावलंबनाचा आधार बनली आहे. ज्या हातांना बालपणी आई-वडिलांच्या मायेचा आधार हवा होता, तेच हात आज स्वतःच्या कष्टांनी स्वतःचे भविष्य घडवत आहेत आणि इतरांच्याही आयुष्यात आशेचा गोडवा पसरवत आहेत.

तिच्या यशामागे मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास आहे. त्याचबरोबर योग्य वेळी मिळालेली संधी, संस्थेचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यांचाही मोठा वाटा आहे. आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या आशा सदनबद्दल आरती आजही मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.

बालगृहे आणि महिलागृहे : अनेक आयुष्यांना नवी उमेद देणारा आधारवड

आरतीची कथा ही केवळ एका महिलेच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी नाही; ती महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रेरणादायी यशोगाथा आहे.

अनाथ, निराधार आणि संकटग्रस्त बालकांना सुरक्षित निवारा, भोजन, शिक्षण, संगोपन आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळाव्यात, तसेच गरजू महिलांना आधार आणि स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्यास मदत व्हावी, यासाठी विभागांतर्गत विविध योजनांद्वारे बालगृहे आणि महिलागृहे चालविली जातात. ही गृहे केवळ निवारा देणारी केंद्रे नसून, अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी, त्यांना आत्मविश्वास देणारी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणारी आधारस्थाने आहेत.

जिच्या आयुष्याची सुरुवात आधाराच्या शोधात झाली, तीच आरती आज स्वावलंबनाच्या बळावर स्वतःचे विश्व उभे करत आहे. आशा सदनने दिलेल्या आधाराचे तिने यशात रूपांतर केले आणि आता इतर महिलांना रोजगार देत त्यांच्या आयुष्यातही आशेचा दिवा पेटविला आहे. तिची ही संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणेचा गोडवा देणारी आणि महिला व बालविकास विभागाच्या आधारवडाची ताकद अधोरेखित करणारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments