गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचे, उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, कला-संस्कृतीचे दर्शन घडते, सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि लाखो भाविकांना बाप्पाचे दर्शन घेण्याची संधी मिळते. मात्र, याच उत्सवाचे स्वरूप आता काही ठिकाणी गर्दी, गोंधळ, वाहतूक कोंडी आणि दर्शनासाठी होणाऱ्या अवास्तव स्पर्धेमुळे चिंतेचा विषय बनले आहे. प्रसिद्ध सार्वजनिक गणेशमूर्तीचे दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही, असा समज वाढत चालला आहे. त्यातून निर्माण होणारी गर्दी ही केवळ व्यवस्थापनाची समस्या राहिलेली नसून, ती भक्तीच्या बदलत्या स्वरूपाचेही दर्शन घडवत आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण नेमके काय शोधत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात काही प्रसिद्ध मंडळांकडे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. दूरदूरून लोक दर्शनासाठी येतात. काही ठिकाणी रांगा कित्येक तास चालतात. वृद्ध, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. काही भाविक पहाटेपासून रांगेत उभे असतात, तर काही जण रात्री उशिरापर्यंत दर्शनाची प्रतीक्षा करतात. या सगळ्या भक्तिभावामागे बाप्पाविषयीची श्रद्धा आहे, हे नाकारता येणार नाही. पण श्रद्धेला विवेकाची जोड नसेल, तर ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे, गर्दीत धक्काबुक्की सहन करणे, उन्हात किंवा पावसात थांबणे आणि त्यानंतरही कार्यकर्त्यांकडून किंवा सुरक्षा रक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळणे, हे भक्तीचे लक्षण कसे म्हणता येईल?
आजच्या काळात प्रसिद्धीला भक्तीची जोड मिळाली आहे. कोणत्या मंडळात कोणता सेलिब्रिटी आला, कोणत्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी कोणता अभिनेता, अभिनेत्री, राजकारणी किंवा उद्योगपती गेला, याची चर्चा समाजमाध्यमांवर रंगते. त्या मंडळात आपणही गेलो, तिथे दर्शन घेतले, याचे व्हिडिओ काढून ते समाजमाध्यमांवर टाकण्याची स्पर्धा सुरू आहे. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यापेक्षा आपल्या उपस्थितीचे प्रदर्शन करण्याला अधिक महत्त्व मिळत आहे. दर्शन घेताना डोळे मिटून प्रार्थना करण्याऐवजी मोबाइलचा कॅमेरा सुरू असतो. बाप्पाचे दर्शन झाले की नाही, यापेक्षा व्हिडिओ चांगला झाला का, तो किती लोकांनी पाहिला, याची चिंता अधिक भासते. भक्तीचे हे प्रदर्शन कुठे नेऊन ठेवणार आहे, असा प्रश्न पडतो.
प्रसिद्ध सार्वजनिक गणेशमूर्तीचे दर्शन घेणे चुकीचे नाही. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार कुठल्याही गणपतीचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही भक्तांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे, ही त्यांची सामाजिक जबाबदारी आहे. पण दर्शनासाठी होणारी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली, तर त्याचा फटका सर्वांनाच बसतो. वाहतूक कोंडी वाढते, रुग्णवाहिका अडकतात, स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण होते. दुकानदार, कामगार, विद्यार्थी, रुग्ण आणि रोजच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होतात. एका मंडळाच्या दर्शनासाठी हजारो लोक जमा होतात आणि संपूर्ण परिसराचे जनजीवन विस्कळीत होते. हा प्रश्न केवळ पोलिसांचा किंवा महापालिकेचा नाही. मंडळांचे कार्यकर्ते, भाविक आणि प्रशासन या सर्वांनी मिळून यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.
गर्दी वाढण्यामागे प्रसिद्धीची हाव हा एक महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या मंडळाची मूर्ती मोठी आहे, सजावट भव्य आहे, तिथे सेलिब्रिटी येतात, तिथे आकर्षक प्रकाशयोजना आहे, म्हणून हजारो लोक तिकडे धाव घेतात. गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि सामाजिक एकतेचा उत्सव असताना तो आता काही ठिकाणी प्रसिद्धीचा आणि प्रतिष्ठेचा विषय बनत आहे. कोणत्या मंडळात दर्शन घेतले, यावर भक्तीचे मोजमाप होऊ लागले आहे. आपल्या घरच्या गणपतीचे दर्शन घेऊन समाधान मानणाऱ्या कुटुंबांकडे कमीपणाने पाहण्याचे कारण नाही. उलट घरच्या गणपतीसमोर शांतपणे बसून प्रार्थना करणे, कुटुंबासोबत आरती करणे आणि आपल्या परिसरातील गरजू लोकांना मदत करणे, हीदेखील गणेशभक्तीचीच रूपे आहेत.
प्रसिद्ध मंडळांच्या कार्यकर्त्यांवरही मोठी जबाबदारी आहे. हजारो भाविक दर्शनासाठी येतात, त्यांची व्यवस्था करणे सोपे नाही. सुरक्षा, रांगा, वाहतूक, वैद्यकीय मदत आणि गर्दीचे नियोजन यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असते. कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत घेत असतात, हेही खरे आहे. पण या मेहनतीचा अर्थ भक्तांशी उद्धटपणे वागण्याचा अधिकार असा होत नाही. रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध व्यक्तीला, लहान मुलासोबत आलेल्या आईला किंवा दूरवरून आलेल्या भाविकाला अपमानास्पद शब्द ऐकवणे, त्याच्यावर आरडाओरड करणे किंवा केवळ ओळखीच्या लोकांना पुढे सोडणे, हे कोणत्याही अर्थाने योग्य नाही. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला बाप्पाच्या नावानेच अपमानित केले जात असेल, तर त्या उत्सवाच्या पावित्र्याला धक्का बसतो.
सुरक्षा रक्षकांची दंडेली हा देखील गंभीर प्रश्न आहे. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकांची गरज असते. मात्र, शिस्त राखण्याच्या नावाखाली भाविकांशी गैरवर्तन केले जात असेल, तर त्यावर मंडळांनी लक्ष ठेवले पाहिजे. सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे; परंतु नियम सांगताना माणुसकी विसरता कामा नये. दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीला ढकलणे, शिवीगाळ करणे किंवा त्याच्या श्रद्धेची थट्टा करणे, हे सुरक्षा व्यवस्थेचा भाग होऊ शकत नाही. मंडळांनी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी नेमावेत, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथक ठेवावे आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याची यंत्रणा उभी करावी. भक्तीच्या उत्सवात भक्ताला सुरक्षितता आणि सन्मान मिळणे ही किमान अपेक्षा आहे.
गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनानेही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध मंडळांच्या परिसरात वाहतूक नियोजन, पादचारी मार्ग, रांगेची दिशा, प्रवेश आणि निर्गमनाचे स्वतंत्र मार्ग, आपत्कालीन वाहनांसाठी जागा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था केली पाहिजे. गर्दीचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार दर्शनाची वेळ निश्चित करणे, ऑनलाइन किंवा वेळेनुसार प्रवेशाची व्यवस्था करणे, मंडळांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेणे, हे उपाय उपयुक्त ठरू शकतात. मात्र, यासाठी मंडळे आणि प्रशासन यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. उत्सवाच्या काळात दरवर्षी तेच प्रश्न निर्माण होतात आणि दरवर्षी त्यावर तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. आता दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे.
भाविकांनीही स्वतःच्या वर्तनाचा विचार केला पाहिजे. दर्शनासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण कोणत्या अडचणी निर्माण करणार आहोत, याचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकण्यासाठी एखाद्या मंडळात जाण्याची गरज नाही. बाप्पाचे दर्शन मनापासून घ्यायचे असेल, तर ते कुठेही घेता येते. आपल्या घरचा गणपती, शेजारच्या मंडळाचा गणपती, गावातील गणपती किंवा एखाद्या छोट्या मंडळातील गणपती, हे सगळेच भक्तीचे केंद्र आहेत. बाप्पा मोठ्या मंडपातच असतो आणि छोट्या घरात नसतो, असे नाही. सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेल्या मूर्तीसमोर केलेली प्रार्थना आणि साध्या सजावटीतील मूर्तीसमोर केलेली प्रार्थना, यांचे मूल्य देवाच्या दृष्टीने वेगळे नसते.
गणेशोत्सवाच्या काळात प्रसिद्ध मंडळांकडे जाणाऱ्या भाविकांनी आपल्या घरच्या गणपतीला विसरता कामा नये. घरच्या गणपतीसमोर कुटुंब एकत्र येते, आरती होते, प्रसाद वाटला जातो, नातेवाईक भेटतात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या सगळ्याला प्रसिद्धीची गरज नसते. आपल्या घरच्या गणपतीसमोर मन शांत होते, चिंता दूर होतात आणि कुटुंबातील नात्यांना बळ मिळते. हीच गणेशभक्तीची खरी ताकद आहे. मोठ्या मंडळाच्या दर्शनासाठी पाच तास रांगेत उभे राहूनही मनात समाधान नसेल, तर त्या दर्शनाचा उपयोग काय? आणि घरच्या गणपतीसमोर दहा मिनिटे मनापासून प्रार्थना करून मनाला समाधान मिळत असेल, तर त्याला कमीपणा का?
प्रत्येक भक्तानेही स्वतःला एक प्रश्न विचारावा, आपण बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहोत की आपली उपस्थिती दाखवण्यासाठी? आपण भक्ती करायला जात आहोत की गर्दीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला? या प्रश्नांची उत्तरे मनापासून शोधली, तर गणेशोत्सवातील गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या उपाययोजनांची गरज भासणार नाही. भक्तीला प्रसिद्धीची गरज नसते. देवाला गर्दीची गरज नसते. बाप्पाला आपल्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते.
गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपण त्याच्याकडे जातो. पण त्याच्या दर्शनासाठी जाताना आपणच इतरांच्या वाटेत अडथळे निर्माण करीत असू, तर त्या भक्तीचा अर्थ काय? आपल्या दर्शनामुळे दुसऱ्याचा रुग्णालयात जाण्याचा मार्ग अडत असेल, एखाद्या वृद्धाला त्रास होत असेल किंवा एखाद्या मुलाला गर्दीत भीती वाटत असेल, तर आपण थांबून विचार केला पाहिजे. बाप्पाचे नाव घेऊन दुसऱ्याला त्रास देणे, हे बाप्पाच्या शिकवणीशी विसंगत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात आपण एक संकल्प करूया. प्रसिद्ध मंडळात दर्शन मिळाले नाही, तर नाराज होऊ नका. तासन्तास रांगेत उभे राहून स्वतःला त्रास देऊ नका. कार्यकर्त्यांशी वाद घालू नका. सुरक्षा रक्षकांच्या गैरवर्तनाला उत्तर म्हणून गोंधळ घालू नका. गर्दीत मोबाइल काढून व्हिडिओ करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या. वाहतूक कोंडी होणार नाही, याची काळजी घ्या. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आपल्या घरच्या गणपतीचे दर्शन मनापासून घ्या. कारण
आपल्या घरचा गणपतीही पावतो.






