पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या स्तंभाची ताकद सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर अधिष्ठित असते. परंतु, वर्तमानात माध्यम जगताचे चित्र पाहिले तर एक गंभीर प्रश्न उभा राहतो—आज आपण जे वाचतो किंवा पाहतो, ती खरोखरच वस्तुनिष्ठ बातमी आहे की कोणाचा तरी राजकीय किंवा व्यावसायिक अजेंडा? आजच्या माहितीच्या महापुरात खरी बातमी कोणती, सोयीस्कररीत्या पेरलेली बातमी कोणती आणि समाजमन भडकवण्यासाठी रचलेले ‘नरेटिव्ह’ कोणते, हे ओळखणे सर्वसामान्य वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. अशा कलुषित आणि दिशाभूल करणाऱ्या वातावरणात ‘बातमीदार’ हे नवे माध्यम निखळ आणि शुद्ध बातमीचा ध्यास घेऊन वाचकांच्या दरबारी दाखल होत आहे.
आजचे माध्यम जगत एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. बातम्यांचे मूळ स्वरूप आता राहिलेले नाही; त्याला एकतर राजकीय प्रचाराचे रूप आले आहे किंवा समाजात विकार आणि द्वेष पसरवण्याचे माध्यम बनवले गेले आहे. राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे या दोघांनाही असे वाटू लागले आहे कि, वाचकांना किंवा प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या मार्गाने सहज वाहवत नेता येते. लोकमताला आपल्या सोयीनुसार वळवणे, कृत्रिम लाटा निर्माण करणे आणि मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष उडवणे यालाच आज ‘माध्यम व्यवस्थापन’ म्हटले जात आहे. बातमी जेव्हा प्रचाराचे साधन बनते, तेव्हा सत्याचा बळी जातो. सध्या ‘माध्यमीकरण’ आणि ‘पेरलेल्या बातम्या’ यांचा सुकाळ झाला आहे. एकांगी माहिती देणारी, पूर्वग्रहदूषित आणि एका विशिष्ट मानसिकतेत समाजाला ढकलणारी बातमीदारी आज उजळ माथ्याने फिरत आहे. या गदारोळात वाचकाची स्वायत्तता हिरावून घेतली गेली आहे. वाचकाने काय विचारा करावा, काय अनुभवावे आणि कोणाच्या बाजूने उभे राहावे, हे देखील माध्यमेच ठरवू लागली आहेत. ही स्थिती लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
या पार्श्वभूमीवर ‘बातमीदार’ ची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहे. “बातमी थोपणार नाही” हे केवळ एक ब्रीदवाक्य नसून वाचकांशी केलेला एक नैतिक करार आहे. घटनेचे, प्रसंगाचे किंवा वस्तुस्थितीचे यथायोग्य आणि सत्य संकलन करणे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि बातमीमागचे बरे-वाईट परिणाम काय होतील, त्याचा अर्थ कसा लावावा या सर्व गोष्टी वाचकांच्या विवेकबुद्धीवर सोपवणे हेच बातमीदाराचे मूलभूत कर्तव्य असेल. आम्ही वाचकांना केवळ ‘उपभोक्ता’ मानत नाही, तर त्यांच्याकडे स्वतःची स्वतंत्र विचारसरणी आणि विवेक आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. संपादकीय मत आणि बातमी यांची सरमिसळ न करता, बातमीला बातमीच्याच रूपात मांडणे हेच आमचे आद्य कर्तव्य असेल. वाचकांवर कोणतेही मत लादले जाणार नाही; उलट, त्यांना निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल.
कोणत्याही नव्या उपक्रमाची सुरुवात ही योग्य वेळेवर आणि योग्य हेतूने व्हावी लागते. ‘बातमीदार’चा पाया रचण्यासाठी नवरात्राचा, आदिशक्तीच्या आणि आदिमायेच्या जागरणाचा कालखंड निवडला गेला आहे, हा केवळ एक योगायोग नाही. पावसाळ्यानंतर वातावरणातील मळभ दूर होऊन आकाशात आणि मनात उत्साहाचे भरते येण्याचे हे दिवस असतात. गेल्या काही महिन्यांपासून काळ्या आईच्या कुशीत पेरलेले सोने उगवून वर येण्याचा, कष्टकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलण्याचा हा काळ आहे. वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हा सण नवा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. ज्याप्रमाणे निसर्गातील मरगळ दूर होऊन नवीन सृजनाची चाहूल लागते, त्याचप्रमाणे माध्यम जगतातील अविश्वासाचे आणि कलुषिततेचे मळभ दूर करून एका नव्या, स्वच्छ आणि वस्तुनिष्ठ बातमीदारीची सुरुवात करण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आजच्या काळात तंत्रज्ञान बदलले, माध्यमे बदलली, बातम्या पोहोचवण्याचे वेगवान मार्ग उपलब्ध झाले; परंतु या सगळ्यात एक गोष्ट दुरावली, ती म्हणजे ‘विश्वासार्हता’. बातमीदार या विश्वासाची पुनर्स्थापना करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणतीही सरमिसळ न करता, तथ्य आणि सत्यावर आधारित बातमी मांडणे, बातमीचा स्त्रोत आणि तिची वस्तुस्थिती वाचकांसमोर उघडी ठेवणे, तसेच कोणत्याही राजकीय किंवा व्यावसायिक दबावाला बळी न पडता काम करणे ही आमची बांधिलकी असेल. हा प्रवास सोपा नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. एका बाजूला प्रलोभने, दबाव आणि टीआरपीची चढाओढ असताना निष्पक्षतेचा मार्ग स्वीकारणे म्हणजे प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासारखे आहे. आज ‘बातमीदार’ आपल्या हाती देताना आमच्या मनावर एक वेगळेच दडपण आणि जबाबदारीची जाणीव आहे. पण या दडपणापेक्षाही वाचकांशी असलेल्या नैतिक नात्याची ताकद मोठी आहे.
‘बातमीदार’ हा केवळ एक कागदाचा तुकडा किंवा स्क्रीनवरील मजकूर नाही, तर तो आपल्या सर्वांच्या विचारांचा आणि विश्वासाचा आरसा आहे. शुद्ध बातमी देणारा आणि प्रत्येक टप्प्यावर तुमच्या विश्वासाला पात्र ठरणारा हा ‘बातमीदार’ तुम्हाला नक्कीच तुमचा आपला वाटेल, यासाठी आमची अखंड धडपड असेल. आदिशक्तीच्या या पावन पर्वात, चला आपण सर्व मिळून एका नव्या, सजग आणि स्वतंत्र माध्यम संस्कृतीचे स्वागत करूया. सत्य आणि विवेकाची ही मशाल सतत तेवत ठेवण्यासाठी वाचकांचे पाठबळ हीच आमची खरी ताकद असेल.



