Homeविश्लेषणगर्दीचा पूर आणि आरोग्याचे आव्हान

गर्दीचा पूर आणि आरोग्याचे आव्हान

 गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.  अवघे वातावरण भक्तिमय झाले आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे आणि गौरींचे थाटामाटात, अश्रूभरल्या डोळ्यांनी निरोप दिल्यानंतर आता उत्सवाचा उत्तरार्ध सुरु झाला आहे. परंतु, उत्सवाच्या या अथांग धामधुमीत आणि भव्यतेत एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे आपले दुर्दैवाने दुर्लक्ष होत आहे आणि तो घटक म्हणजे ‘सार्वजनिक आरोग्य’. गणेशोत्सवाचा हा काळ यंदा मान्सूनच्या परतीच्या आणि बदलत्या हवामानाच्या काळात आला आहे. त्यातच मलेरिया, डेंग्यू, चिकणगुनिया आणि कीटकजन्य आजारांनी  मान वर काढली आहे. अशा स्थितीत रस्त्यांवर होणारी अलोट गर्दी ही संसर्गजन्य आजारांच्या प्रसारासाठी एक अत्यंत सुपीक जमीन ठरत आहे. त्यामुळे उत्सवाच्या या आनंदाला आजारपणाचे ग्रहण लागू द्यायचे नसेल, तर आता अत्यंत सतर्कतेने काळजी घेण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्याचे दिवस आणि गणेशोत्सवाचा काळ हे समीकरण आरोग्य यंत्रणेसाठी दरवर्षीच आव्हानात्मक असते. यंदा तर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पडलेला अवकाळी आणि थांबून-थांबून होणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी यांमुळे डासांची पैदास प्रचंड प्रमाणात झाली आहे. डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण गेल्या काही आठवड्यांपासून वेगाने वाढत आहेत. त्यातच आता सार्वजनिक गणेशोत्सवाची गर्दी, रात्री उशिरापर्यंत चालणारे दर्शन, बाहेरचे उघड्यावरील खाणेपिणे आणि अस्वच्छता यांमुळे आजारांचा फैलाव होण्याचा धोका दुपटीने वाढला आहे.
कीटकजन्य आजारांचा विचार केला तर परिस्थिती अधिक गंभीर दिसते. गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. मोकळ्या जागेत उभारलेले भव्य देखावे, मंडप आणि तेथील तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
केवळ डास किंवा हवेतून पसरणारे आजारच नव्हे, तर या काळात दूषित अन्न आणि पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा  धोकाही तितकाच तीव्र असतो. उत्सवाच्या धामधुमीत रस्त्यांच्या दुतर्फा खाद्यपदार्थांचे तात्पुरते स्टॉल्स, ज्यूस सेंटर आणि हातगाड्यांचे पीक येते. यातील बहुतांश ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचा फज्जा उडालेला असतो. उघड्यावर ठेवलेले अन्न, साचलेले सांडपाणी, वापरलेले अस्वच्छ पाणी आणि असुरक्षित पाण्याचा बर्फ यांमुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कावीळ आणि जुलाबासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. गर्दीत फिरताना तहान लागल्यानंतर नागरिक सर्रास मिळणारे दूषित पाणी किंवा बर्फाचे रस पितात आणि आजारांना आमंत्रण देतात.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक सोहळा उरलेला नाही, तर तो आपल्या सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. परंतु, समाज एकत्र येत असताना सामाजिक आरोग्याचे भान सुटले, तर या उत्सवाचा आनंद औटघटकेचा ठरू शकतो. ही वेळ एकमेकांवर बोट दाखवण्याची किंवा केवळ प्रशासनाला दोष देण्याची अजिबात नाही, तर प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन ‘आरोग्यपूर्ण उत्सव’ साजरा करण्याची आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. केवळ गणेशोत्सवाचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळून चालणार नाही, तर आरोग्यविषयक उपाययोजनांची अमलबजावणी युद्धपातळीवर करावी लागेल. कीटकनाशक फवारणी आणि धूर फवारणी  गणेशोत्सव मंडळांच्या परिसरात, देखाव्यांच्या रांगा लागणाऱ्या मार्गांवर दररोज नियमितपणे धूर फवारणी आणि अळ्यानाशक औषध फवारणी झाली पाहिजे.  साचणारे पाणी तात्काळ उपसणे किंवा त्यावर जंतूनाशके टाकणे गरजेचे आहे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कसून तपासणी व्हायला हवी.
नागरिक आणि भाविक म्हणून आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सर्वात मोठी आहे. उत्सवाचा आनंद लुटताना  आजाराकडे दुर्लक्ष नको.
त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनी देखील केवळ देखावे आणि रोषणाईवर खर्च न करता सामाजिक जबाबदारीचे भान जपले पाहिजे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंडपाच्या आसपास स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी.
 हा विघ्नहर्त्याचा उत्सव आहे. बाप्पा हा संकटांचे निवारण करणारा आहे, असे आपण मानतो. परंतु, बाप्पावर निष्ठा ठेवताना विवेक आणि आरोग्याचे भान ठेवणे हीच खरी भक्ती ठरेल.  पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले असले, तरी मुख्य अनंत चतुर्दशीचा सोहळा आणि विसर्जन मिरवणुका अजून बाकी आहेत. त्या दिवशीची गर्दी ही कित्येक पटीने जास्त असेल. म्हणूनच, आरोग्याकडे दुर्लक्ष करून साजरी केलेली कोणतीही पर्वणी पूर्ण होऊ शकत नाही. ‘आरोग्य हीच संपत्ती’ या उक्तीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि समाजाची काळजी घेतली तरच गणेशोत्सव खऱ्या अर्थाने आरोग्यदायी, सुरक्षित आणि आनंददायी ठरेल. चला, विघ्नहर्त्याच्या या उत्सवात आजारांचे विघ्न दूर ठेवण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा दृढ संकल्प करूया!
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments