Homeताज्या बातम्याघरकामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले

घरकामाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले

क्राइम ब्रँचकडून दोघांना अटक

मुंबई : घरकामाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मुंबई क्राइम ब्रँचने कारवाई करत या कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, मुलीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबा परवीन खान (३२) आणि मोहम्मद युसूफ शेख (४६) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
क्राइम ब्रँचच्या माहितीनुसार, आरोपींनी अल्पवयीन मुलीला घरकामाची नोकरी देण्याच्या बहाण्याने चाळीतील एका खोलीत नेले. त्यानंतर तिला कथित वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये ढकलण्यात आले. शेख हा चाळीतील खोलीतून हे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तर खान हिने घरकामाच्या नोकरीचे आमिष दाखवून मुलीला या रॅकेटमध्ये आणण्यात भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे.
मुलीला अनेक वेळा या खोलीत नेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिचे कथित अपहरण करून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. विरोध केल्यास बदनामी करण्याची तसेच तिच्या आईला इजा करण्याची धमकी आरोपींकडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर क्राइम ब्रँचने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. कथित व्यवहारासाठी १० हजार रुपये देण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली.
सुटकेनंतर मुलीचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने घरातही शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. तिच्या पायांवर भाजल्याच्या खुणा आढळल्या असून, अभ्यासावरून आईने मारहाण करताना या जखमा केल्याचा आरोप मुलीने केला आहे. पालकांच्या घटस्फोटानंतर ती आईसोबत राहत होती. तिच्या सुरक्षिततेसाठी एनजीओच्या मदतीने तिला निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी बीएनएस, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पिटा) आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments