मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि त्यांच्या मातोश्री वीणा देवगण यांच्या जुहू येथील बंगल्यात परवानगीशिवाय बांधकाम व फेरबदल केल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकामासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्याने मुंबई महापालिकेच्या (BMC) के-पश्चिम विभागाने संबंधित बांधकाम अनधिकृत ठरवून कारवाई केली.
जुहू येथील एन. एस. रोड क्रमांक ११, जेव्हीपीडी परिसरातील कपोल सहकारी गृहनिर्माण संस्थेतील या मालमत्तेत सिपोरेक्स ब्लॉकचा वापर करून वाढीव बांधकाम आणि फेरबदल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर पालिकेने १० सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३५४ अ अंतर्गत काम थांबविण्याची नोटीस बजावली होती. या नोटिशीद्वारे संबंधित मालकांना तातडीने बांधकाम थांबवून २४ तासांच्या आत आवश्यक परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न केल्यास अनधिकृत बांधकाम आणि बांधकाम साहित्य मालकाच्या खर्चाने हटविण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला होता.
दरम्यान, संबंधित मालकांनी १५ सप्टेंबर रोजी पालिकेकडे खुलासा सादर केला. मात्र, बांधकामासाठी महापालिकेची किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे या खुलाशासोबत जोडण्यात आली नव्हती. त्यामुळे के-पश्चिम विभागाने ६ ऑक्टोबर रोजी हा खुलासा फेटाळून लावला.
आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर न झाल्याने संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानुसार बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



