HomeBlog...आणि माझं टाळकंच सणकलं

…आणि माझं टाळकंच सणकलं

जेजेमधून मी १९७१ साली डिप्लोमा घेऊन बाहेर पडलो. तसा मी तीनच वर्षं जेजेत होतो. पहिल्या वर्षी मी ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिकलो. त्यानंतर मध्ये एक वर्ष गॅप घेतली. नोकरी केली. आणि नंतर मग जेजेत आलो. त्यावेळी हणमंते सर डीन होते. घरची परिस्थिती अत्यंत वाईट. त्यामुळे पैसा ज्यात मिळेल ते करायचं असं ठरवून कमर्शियल आर्टला गेलो. त्या तीन वर्षांतली माझी फीसुद्धा हणमंतेसरांनी भरली. आणि रंग, ब्रश, पेपरला पैसे दामू केंकरे सर देत असत. त्या वेळचे त्यांचे ७५ रुपये मी अद्यापि देणं लागतो. पण मी ते त्यांना देणार नाही. त्यांच्या ऋणातच मला राहायचं आहे. असो.

या सगळ्यामुळं विद्यार्थी म्हणून कॉलेजचं आयुष्य मजेत घालवणं वगैरे मला कधी करता करता आलं नाही. चॉईसच नव्हता. एकच एक लेंगा-झब्बा रात्री धुऊन सकाळी कॉलेजात जाताना मी घालायचो. माझ्या बरोबरीच्या काही मुलींना मी लेटरिंग वगैरे करून द्यायचो आणि त्या मला खायला-प्यायला घालायच्या. खरं म्हटलं तर कॉलेजला वगैरे जाणं हीच त्यावेळी माझी लक्झरी होती.

म्हणूनच मग कॉलेजच्या व्यतिरिक्त फावल्या वेळात मी बाहेरची कामं खूप करायचो, हणमंते सर मला सरकारची बरीच कामं द्यायचे दामू केंकऱ्यांनी तर २६ जानेवारीच्या फ्लोटचं काम मला दिलं होतं. तेव्हा मी शेवटच्या वर्षाला होतो. त्या कामाचे मला चक्क एकरकमी पाचशे रुपये वगैरे मिळाले. त्यावर्षी मी पहिल्यांदाच कॉलेजच्या स्टडीटूरला गेलो. तर सांगायचं काय की घरच्या परिस्थितीमुळंच कॉलेजमध्ये असताना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वगैरे घडामोडी काय बुवा चालल्यात ते पाहायला मला वेळच नव्हता. ते दिवसच तसे होते, कुणी पाहू नये म्हणून रात्री शेवटची ट्रेन गेली की मी आणि माझा भाऊ रंगाचे डवे, ब्रश आणि लाकडी घोडा घेऊन दुकानांचे बोर्ड्स रंगवायला दादर स्टेशनजवळ जायचो. एकदा तर एवढं जागरण झालं की वर्गात माझा चक्क कधी डोळा लागला ते मला कळलंच नाही. तेव्हाचे वर्गशिक्षक माझ्यावर जाम चिडले. मला हणमंते सरांकडं घेऊन गेले. हणमंते सरांना सर्व काही माहीत होतं. ते मला काही एक बोलले नाहीत.

कॉलेजच्या आवारात एकदा आम्ही असंच व्हॉलीबॉल खेळत होतो. तेव्हा रमाकांत देशपांडे सर आले. मी त्यांना आपलं सहज म्हणालो, “सर, मला पण नाटकात काम करायचंय हं!” त्यावर सर म्हणाले, “काय रे, मला धमकी देतोस काय?” पुढं कॉलेजतर्फे ‘ससा आणि कासव’ हे संपूर्ण नाटक करायचं ठरलं. त्यापूर्वी कॉलेज फक्त आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत एकांकिका करत असे. ‘ससा आणि कासव’साठी पाहिजे तशी मंडळी देशपांडे सरांना मिळाली नाहीत. ते मला म्हणाले, “काय रे, तुला नाटकात काम करायचं होतं ना रे! मग आला नाहीस तो निवडीला?” त्यानंतर सरांनी माझं रीतसर वाचन वगैरे घेतलं आणि मला त्यातली श्रीधरची भूमिका दिली.

नाटकाचा प्रयोग होता त्यादिवशी मला तर फेफरं यायचीच पाळी. दत्ता भट वगैरे बडी बडी मंडळी नाटक पाहायला आली होती. कारण मुळात हे नाटक ‘रंगायन’नंच केलं होतं. दत्ता भटांकडं पाहून माझी घाबरगुंडी उडाली. ते चिडले आहेत की प्रेमाने बोलताहेत याचा मला नेमका अंदाजच येईना. असा त्यांचा मुडपलेला चेहरा. मी स्टेजवर जायलाच तयार होईना. मग देशपांडे सरांनी मला धीर दिला. त्यानंतर प्रयोग दणक्यात झाला. सर्वांना तो अतिशय आवडलाही.

प्रयोगाच्या दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये डिनर होतं. याला अर्थातच पाच-दहा रुपये वर्गणी होती. यामुळे मी अर्थातच त्यामध्ये नव्हतो. पण देशपांडे सरांनी मला आग्रहानं यायला सांगितलं. “हे माझं व्यक्तिशः आमंत्रण आहे असं समज.” असं ते म्हणाले. मग मी दुसऱ्या दिवशी एका मित्राचा बाटीक प्रिन्टचा शर्ट उसना आणला. खादीची एक पॅन्ट तोपर्यंत मी घेतली होती. आणि मग तो टिपीकल जेजे स्टाईल रंगीबेरंगी पोषाख घालून मी डिनरला गेलो.

बस! यानंतर नाटकाचा विचार संपला. नाटकात पुढं काम करायचं वगैरे चुकूनही मनात आलं नाही. त्यावेळी डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं, ते म्हणजे ‘लिंटास’मध्ये आर्टिस्ट म्हणून नोकरी करायची. लिंटासविषयी फार ऐकलं होतं, त्यामु‌ळे लिंटासमध्ये नोकरी मिळाली म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं काहीतरी वाटायचं.

पण आता मी जो या अभिनय क्षेत्रात पडलो आहे, त्यामध्ये जेजेच्या त्या तीन वर्षांतील अभ्यासक्रमाचा आणि एकूण वातावरणाचा मला खूपच उपयोग होतो. मुळात चित्रपटात जी एक चौकट असते ती चौकट नुसतं दृश्य वाचलं तरी आधीच माझ्या डोळ्यांसमोर येते. म्हणजेच कल्पनाशक्ती अफाट काम करते. व्हिज्युअलाईज करायची जेजेत एवढी सवय होते की या ठिकाणी माझी ती एक जमेची बाजू ठरते, शिवाय जेजेत आणखी एक सवय लागते. ती म्हणजे वेगळं काहीतरी करायची. त्याच्यापेक्षा माझं डिझाईन वेगळं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा माझं पोस्टर वेगळं असलं पाहिजे… अशी नावीन्याची ओढच आपल्याला जेजेत लागते. या नावीन्याच्या, वेगळेपणाच्या ओढीमध्ये आपली सर्जनशीलता, रचनात्मकता जोपासली जाते. आणि ती अंगात जोपासलेली रचनात्मकता, सर्जनशीलता मला एखादी भूमिका नाटकात अथवा चित्रपटात साकार करताना प्रचंड मदत करते.

आता तर मी एक नट आहे. पण ज्यावेळी मी दिग्दर्शक होईन त्यावेळी खरं तर मला या सर्व गोष्टींचा जास्तच फायदा होणार आहे. पण नट म्हणूनही एखादी भूमिका करताना मला जेजेतील काही प्रसंग आठवतात. आणि त्यांचंच स्मरण करून मी माझा अभिनय सादर करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘राघु-मैना’ या मराठी चित्रपटात एक प्रसंग होता. कॉलेजचे प्राचार्य आणि एक उनाड विद्यार्थी. मी जेजेमध्ये असताना एकदा मला असंच हणमंते सरांसमोर उभं करण्यात आलं होतं. तेव्हा सर मला म्हणाले होते, “हे बघ नाना, मी तुला किती वेळा पाठीशी घालणार? तू मला अडचणीत टाकतोयस.” यावर मी काहीही न बोलता गप्प राहिलो. सरांनी मला वर्गात जायला सांगितलं. पण मी तिथून हलू शकलो नाही. बऱ्याच वेळानं सर उठून माझ्याजवळ आले आणि त्यांनी पाठीवरून हात फिरवला. तोपर्यंत मी ओशाळून खलासच झालो होतो. तर नेमक्या याच प्रसंगाची आठवण होऊन मी चित्रपटातला प्रसंग अभिनयांकित केला. असे एक ना दोन, अनेक प्रसंग सांगता येतील.

जेजेतील निवडणूक म्हणजे एक अनुभवच होता. आता ज्याला स्ट्रीट प्ले वगैरे म्हणतात ते सर्व काही आम्ही निवडणूक प्रचाराकरता करत असू. ढोलकी घेऊन नाचण्यापासून ते सर्व काही. त्या लीडरशीपचाही नाटका-सिनेमात एखादा प्रसंग सादर करताना उपयोग होतोच, नकळत त्या जुन्या घडलेल्या प्रसंगांची आठवण होते.

माझ्या आठवणीतला एक मजेदार प्रसंग. जेजेमध्ये एक गुजराथी किंवा बोहरी प्राध्यापक होते. त्यांचा मराठी मुलांवर फार खुन्नस असे. वर्गात कायम घालून -पाडून बोलायचे. कधी तरी माझ्या हजेरीवरून ते म्हणाले, “साला, तुम मराठी लोग भीक मांगेगे.” हे ऐकल्यावर माझे टाळकंच सणकलं. मधल्या सुटीमध्ये मी अंजुमन इस्लाम शाळेजवळ उभा राहिलो. तिथं ते प्राध्यापक आल्यावर मी त्यांना एक लाफाच चढवला. ते भिंतीवर कोसळले. मग एकदोघे मधे पडले आणि मला बाजूला केलं. त्यांनी अर्थातच माझ्याशी बोलणंच सोडलं. वर्गात मला करेक्शन्स देत नसत. माझ्याकडं बघतही नसत. एक दिवस परीक्षा झाल्यानंतर एक उत्कृष्ट लेटरिंग नमुना म्हणून त्यांनी फळ्यावर लावलं, आणि सबंध वर्गात त्याची वाखाणणी केली. शेवटी हा रोलनंबर माझा निघाला. आता काय प्रतिक्रिया द्यावी हे त्यांना आणि मला दोघांनाही कळेना. मग तास संपल्यावर त्यांनी मला स्वतःच्या खोलीत बोलावून घेतलं आणि “तुझा हात इतका चांगला आहे. तू वेळेवर का येत नाहीस? वेळच्या वेळी अभ्यास का करत नाहीस?” वगैरे चौकशी केली. मी माझी अडचण सांगितली. खरी परिस्थिती कथन केली. त्यानंतर मग आम्ही मित्रच झालो.

आता मी जेव्हा वेळ वगैरे मिळेल तेव्हा लेटरिंग वगैरे करतो. कमर्शियल आर्टची काम करतो. कधी कधी माझ्या नाटकाचं प्रेस-लेआऊटसुद्धा करतो. अभिनय हे सध्या पोटापाण्याचं साधन असलं तरी ते जेजेच्या अनुभवावरच बेतलेलं आहे असं मी म्हणेन आणि म्हणूनच जेजेतील तीन वर्षं ही फुकट गेली असं मी कधीच म्हणणार नाही. किंबहुना तेव्हाच मी खरं जग बघितलं. खरी माणसं पाहिली, खरं आयुष्य अनुभवलं. आता अभिनयातून जे सादर करतो ते त्या वेळी जे भावलं त्याची प्रतिकृती आहे.

शब्दांकन : मीना नाईक

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments